देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. आज रुग्णांना ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर आणि व्हेंटीलेटरसाठी अक्षरश: झगडावं लागत आहे. त्यातच लखनौमध्ये व्हेंटीलेटरअभावी एका डॉक्टरचा मृत्यू झालंच समोर आलं आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीला डॉक्टरांना देखील सामोरं जावं लागत आहे. प्रयागराज येथे ८५ वर्षीय डॉक्टर जे.के. मिश्रा यांचे करोना संसर्गामुळे निधन झालं आहे. करोनाचं निदान झाल्यानंतर त्यांना ते जेथे काम करत होते, त्याच स्वरुप राणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र त्यांना जेव्हा व्हेंटीलेटरची अवश्यकता होती, तेव्हा त्यांना ते मिळू शकलं नाही. त्यामुळे पत्नीच्या डोळ्यावर डॉ. मिश्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे डॉ.मिश्रा यांनी या रुग्णालयात ५० वर्षे रुग्णांची सेवा केली होती. तिथेच त्यांचा व्हेंटीलेटरअभावी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज देशभरात वाढत असलेल्या रुग्णसंख्यामुळे वैद्यकीय सेवेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकांना उपचारअभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत.