निसर्गाची उत्पत्ती व उत्क्रांती शोधताना मध्यात कुठेतरी स्त्री व पुरुष यांची भूमिका फार महत्त्वाची ठरते, अधिक अध्ययन केल्यास ‘ समाज ‘ नावाची संज्ञा अधोरेखित होईल. आणि ह्याच समाजाने आजपर्यंत ह्याच एका नैसर्गिक शक्तीचे, ‘आदिशक्ती’ म्हणून पूजन केले त्या आदिशक्ती बद्दल आपण विचारमंथन करणार आहोत.
जागतिक महिला दिन साजरा करत असताना भारतातील अनेक महान महिला विभूती समोर येतात. सावित्रीबाई फुले यांपासून अगदी इंद्रा नुई या पर्यंतच्या महिलांचा उल्लेख होतो आणि तो सार्थ ही आहे. यांच्या कर्तृत्वाने अखिल जगाला मुग्ध आणि स्तिमित करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या पदाच्या उंची पेक्षा विचारांची उंची आणि संघर्षमय पथ हेच असावे. आणि इथेच ‘ समतोल ‘ आणि ‘ संतुलन ‘ या शब्दांची फारकत लक्षात येते, थोडक्यात ती टोचते.
दरवर्षी महिलादिनी स्त्रियांच्या गौरव कथा आणि त्यांचा सत्कार या आपण ऐकत , पाहत आलो, आणि त्याने समाजाला चालना दिली. मात्र समाजाने स्त्री सबलीकरणासाठी ज्या वेगाने मार्गस्थ व्हायला हवे होते, तो वेग मंद जाणवतो. आणि याची समुळ मीमांसा करताना ‘ समतोल आणि संतुलन यातला बदल समजून घ्यायला हवा.
स्त्री शक्तीचे प्रकटीकरण मोठ्या प्रमाणात व्हायचे असेल तर तिच्या क्षमतांची व्याप्ती वाढवण्याची गरज नाही तर फक्त त्यांची ओळख तीला करून दिली तरी पुरेसे आहे.आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आहे व आपले मत प्रदर्शित करत आहे हे आनंददायी च आहे, पण इथून पुढच्या काळात त्यांतला सुलभ पना आणि व्याप्ती ह्या बदलत्या काळात स्त्री वर्गाला बळकट करेल.शिक्षण, आरोग्य, संस्कृती, सुरक्षा, अर्थ कारण, समाज कारण, राजकारण यांत त्यांच्या सहभाग झाला पण त्याला सढळ मनाने मान्यता द्यायला हवी. आणि स्त्रियांनी इथेच न थांबता या क्षेत्रांत अग्रेसर होण्यासाठी जिज्ञासू असणे आवश्यक ठरेल!
स्त्री सबलीकरण ही एक मनोवैज्ञानिक अभिक्रिया आहे त्यासाठी पालक, पुरोगामित्व या सहीत स्त्रियांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दृष्टिकोन गरजेचा आहे. महिला आरक्षण व इतर सवलती फक्त उत्प्रेरक म्हणून काम करतील. जगाला मोहित करणारी चंद्रमा आणि संपूर्ण जगाला प्रकाशित करणारी सुर्य देवता जर अनुक्रमे अलांच्छित आणि तापहीन असेल तर जी समृद्ध ता लाभेल तद्वत स्त्री चे स्वरूप आहे. समतोल हा केवळ एक निकष आहे, परंतु संतुलन ही एक प्रक्रिया ! आई, बहीण, बायको, मुलगी इतक्या भूमिका सांभाळताना तिची महती वेगळी काय सांगणार? परंतु हेच समाजाचा वर्धिष्णु पणाचे द्योतक आहे.कारण स्त्रीचा विकास केल्यास समाज आपोआप अग्रेसर होतो! आणि त्यामुळेच जितक्या वेगाने सबलीकरण चालू असेल तितक्याच प्रभावाने क्रूर अन्यायी प्रवूर्तीचे निर्मूलन नितांत आवश्यक आहे! एका सहज, सुंदर जीवन शैलीची अभिलाषा असेल तर चंद्रमे जे अलाच्छंन, मार्तंड जे तापहीन! हे आपल्या सर्वांना मिळून करणे गरजेचे आहे. आज महिला दीन आहे म्हणून दिवस विशेष नसून ती महिला विशेष आहे हे समजून घेऊन प्रत्येक दीन ती सन्मानाने जगणे हा मला अभिप्रेत असलेला महिलादिन ! शुभेच्छा!