मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आता मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली असून त्यासंदर्भात ८ मार्च म्हणजेच आजपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू झाली आहे. या ठिकाणी न्यायालयाने दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मार्च ला होणार असल्याचे सांगितले आहे.
फक्त महाराष्ट्राचाच हा मुद्दा नसून इतर राज्यांमध्ये देखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेलं असून त्या राज्यांचा देखील यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून या प्रकरणात आता ज्या राज्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा राज्यांना देखील नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.
याच मुद्यावर काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. “मराठा आरक्षणाला राजकीय वळण दिलं जाऊ नये. मराठा समाजाला आरक्षणात फायदा मिळावा ही आमची भूमिका आहे. भाजपकडून याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू असून ते राज्यासाठी चुकीचं आहे. त्यावरून चुकीचे संकेत जात आहेत”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.