संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार हा वाढतच चालला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वाना कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. नॉर्वेमध्ये कडक लॉकडाऊन लागला असून १०च्या वर लोक जमले तर दंड आकाराला जातो.
मात्र एर्ना सोलबर्ग यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुटुंबीताल सदस्यांना एकत्रित केले होते. याठिकाणी नातेवाईकांची गर्दी झाली त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पंतप्रधान यांच्यावर दंड ठोठावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली त्या हॉटेलनेही नियम तोडले तसेच पंतप्रधानांच्या पतीनेही नियमांचे उल्लंघन केले मात्र त्यांच्यावर दंड आकारण्यात आला नाही. परंतु पंतप्रधान निर्बंध लागू करणाऱ्या सरकारचं प्रतिनिधित्व करतात त्यासाठी आम्हाला त्यांना दंड आकारावा लागला.
कायदा सर्वांसाठी एकसमान असतो, पण सर्वजण कायद्याच्या नजरेत एकसारखे नसतात. या सर्व घडलेल्या घटनेनंतर रॉयटर्सच्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाने आतापर्यंत या प्रकरणावर कोणतंही भाष्य केले नाही. वाढदिवसाच्या पार्टी केल्याबद्दल पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी माफी मागितली आहे.