शासन कसे असावे हा प्रश्न पडताच शिव छत्रपती शासनअसे उत्तर आपसूकच येते.रयतेच्या रक्षणासाठी आणि स्वराज्यासाठी स्वतः ला वाहून घेतलेला ऐसा राजा पुन्हा होणे नाही.अश्या या रयतेचा राजा आणि स्वराज्यावरील निष्ठा असणाऱ्या जीवाची बाजी लावणाऱ्या शिलेदारांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारी जय भवानी-जय शिवाजी मालिका २ मे पासून स्टार प्रवाहवर रात्री दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
विशेष म्हणजे मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा भूषण प्रधान हा शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.भूषणच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही भूमिका विशेष ठरणार आहे.नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांच्या पराक्रमाची शौर्य गाथा आपल्याला माहीतच आहे.
महाराजांची भूमिका साकारायची संधी मिळणं हे प्रत्येक अभिनेत्याप्रमाणे माझंही स्वप्नं होतं व ते आता पूर्ण होत आहे. गेले आठ वर्षे मी भारदस्त भूमिकेच्या शोधात असल्याने छोट्या पडद्यापासून लांब होतो. महाराजांची भूमिका साकारताना त्या भूमिकेचा आदर, उत्सुकता आहे व त्याचबरोबर जबवदारी सुद्धा वाढली आहे.तसेच महाराजांच्या भूमिकेसाठी मालिकेची संपूर्ण टीम मेहनत घेत असून मेकअप व लूक पासून सर्व काळजीपूर्वक पाहिले जाते,असे भूषणने माध्यमांना सांगितले.
जय भवानी जय शिवाजी या ऐतिहासिक मालिकेतील शिवरायांच्या शिलेदारांची भूमिका कोण करत आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विजया दशमी क्रिएशन निर्मित या मालिकेविषयी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतिश राजवाडे यांनी सांगितले की, शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती, ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली.
अशा शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच मातीशी निगडीत आणि रुतलेल्या सशक्त कथा सादर करण्याचा प्रयत्न करत असते. ही मालिका त्या सर्व शूर वीरांना अर्पण असेल. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा.”
स्टार प्रवाह वरील या मालिकेची झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांनी याला तुफान प्रतिसाद दिला आहे.