राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल असा इशारा दिला होता.
मात्र यावर आता निर्णय झाल्याचे वृत्त समोर येत आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्याने राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमत वृत्तसमूहाला दिलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील.
मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर राहिलेला नाही अशी माहिती आता समोर येत आहे.