ऐनवेळी राज्यसरकारने एमपीएससीची परीक्षा रद्द केल्याने पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक परीक्षार्थी रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करत होते. संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच राज्यसरकारने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.
याशिवाय इतर परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसंच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
राज्यसरकारच्या या निर्णयामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. अचानक रद्द झालेल्या परीक्षेमुळे परीक्षार्थी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत होते. परंतु आता तारखा जाहीर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.