मुंबई : आज एकाद्या कचरा पेटीच्या जवळून जाताना नागरिक तोंडाला रुमाल बांधूनच जातात त्या कचऱ्यातून निघणाऱ्या दुर्गंधाच्या वासामुळे अनेकजण त्रस्त होतात. असाच त्रास वडाळा सहकार नगर येथे असलेल्या कचरापेटीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
मात्र आता हीच कचरापेटी लोकांच्या आकर्षणाचा विषय बनत चालला आहे. हीच कचरापेटी सहकार नगरची ओळख ठरू लागली आहे. मुंबईतील पहिली अशी सुशोभित कचरापेटी सहकार नगरमध्ये बनवण्यात आली असून, दुर्गंधीमुळे नकोशी वाटणारी ही कचरापेटी आता सुगंधामुळे सहकार नगरवासियांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनली आहे.
वडाळ्याच्या सहकार नगरमध्ये असलेली कचरापेटी मागल्या काही दिवसांपासून कचरा वर्गीकरण केंद्र म्हणून ओळखले जात होते. मात्र या कचरा वर्गीकरणामुळे येणाऱ्या दुर्गंधामुळे अक्षरशः नागरिक त्रस्त होते. स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी आपल्या नगरसेवक निधीतून कचरापेटी सुशोभित करण्याची पहिली संकल्पना मांडली. या कचरापेटीचे वेगळे महत्व म्हणजे मुंबईत अशाप्रकारे सुशोभित करण्यात आलेली ही पहिलीच कचरापेटी ठरली आहे.
सहकार नगरमध्ये एकूण ४६ इमारती आहे. या संपूर्ण इमारतींचा कचरा या कचरापेटीत टाकण्यात येतो दिवसाला १ टन कचरा निर्मिती होत असतो. मात्र प्रशासनाने वर्गीकरण केंद्र सुरु केले तेव्हा पासून दुर्गंधी मोठया प्रमाणात परिसरात पसरत होती. त्यामुळे ही कचरापेटी वेगळ्या प्रकारे सुशोभित करावी जेणेकरुन, नागरिकांना या कचरा पेटीमुळे त्रास होणार नाही. त्या दृष्टीकोनातून अमेय घोले यांच्या नगरसेवक निधीतून याचे सुशोभिकरण करण्यात आले.
याप्रमाणे आजुबाजूच्या भिंती तोडून त्याच्या सर्व बाजुंनी व्हर्टीकल गार्डन विकसित करुन त्यावर सहकार नगरच्या नावाचा डिजिटल फलक लावण्यात आला. त्यामुळे कचरा पेटीचे सुशोभिकरणही झाले आणि सहकार नगरच्या नावाचा आकर्षक फलकही लावता आला. त्यामुळे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी तसेच अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: भेट देऊनही याची पाहणी केली आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सुद्धा या कामाची दाखल घेतली आहे असे नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले.