मागच्या वर्षांपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे जगभरात तयार झालेलं मृत्यूचे सावट अद्यापही गेलेले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील व राज्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून मृत्यूचे प्रमाण अधिक वाढत आहे.दिवसेंदिवस नवे कोरोनाग्रस्तांचा वाढत जाणाऱ्या आकड्यामुळे भीतीचे वातावरण पसरत आहे.
याचपार्श्वभूमीवर सकारात्मक बाब म्हणजे लातूरच्या कृष्णानगर येथे राहणारे १०५ वर्षीय धेनु उमाजी चव्हाण आणि पत्नी ९५ वर्षीय मोताबाई चव्हाण यांनी कोरोनावर सकारात्मकपणे मात केली आहे.
या दाम्पत्याला आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे हे कळताच मनात कुठलीही भीती न बाळगता उपचार सुरू केले. प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या उपचारांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद यांमुळे चव्हाण आजी- आजोबा यांनी कोरोनाला हरवले.
या संदर्भातील माहिती लातूर जिल्ह्याचे ग्रामीण आमदार धीरज देशमुख यांनी ट्विटरवरून दिली आहे. सध्या नकारात्मक परिस्थितीमध्ये ही सकारात्मक बातमी असून कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता वेळेवर उपचार घेऊन कोरोनाशी असलेलं युद्ध आपण जिंकू शकतो. चव्हाण आजी-आजोबाव इतर रुग्णांच्या उपचारासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या सर्व डॉक्टर व नर्स यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच कोरोना संदर्भांतील लक्षणे आढळल्यास कोणताही गैरसमज न बाळगता नागरिकांना वेळीच कोविड टेस्ट करून उपचार करावे. असे लातूरचे ग्रामीण आमदार धीरज देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
कठीण काळात सकारात्मक इच्छाशक्ती कोरोनासारख्या गंभीर विषाणूवर मात करत चव्हाण आजी आजोबांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे.