आज कोरोना लॉकडाऊनला बघता बघता १ वर्ष पूर्ण झालंय. ह्या एका वर्षात संपूर्ण जगाने ज्या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशा गोष्टी घडल्या. मुंग्यांसारखं वळवळणार जग अचानक थांबलं. माणसाच्या डोळ्यात मरणाची भीती जाणवू लागली. अनेक नात्यांमध्ये दुरावा आला. अनेकजण अन्न पाण्याशिवाय तडपडू लागले तर कित्येक लोकांच्या नोकऱ्याही गेल्या. खरंच असं कधी होईल किंवा एक कोरोना संपूर्ण जग जागच्या जागी थांबवेल असं कोणाला स्वप्नात तरी जाणवलं होत का हो? पण हे घडलंय.
गेलं वर्षभर माणूस कोरोनामुळे पिळून निघालाय. कोरोनासोबतच अनेक संकटांना माणसांना सामोरे जावं लागलंय. अनेक ठिकाणी जंगल जळून खाक झालीत, अनेक ठिकाणी महापूर, भूकंप होऊन घर उध्वस्त झालीत. तर जगात कित्येक ठिकाणी दहशतवादी हल्ले, गोळीबार चालू आहेत. खरंच कोरोना लॉकडाऊनमुळे हसावं की रडावं हेच कळत नाहीये.
किड्या मुंग्यांसारखी वळवळणारी मुंबईही एका रात्रीत संचारबंदीच्या घोषणेने बंद झाली. अनेक लोकं आपापल्या गावी रात्रीच्या रात्री जाऊ लागली, कित्येक लोकं तळमळत आपला जीव मुठीत घेऊन गावी गेली. दरम्यान कित्येक जणांचा मृत्यूही झाला. सोशल मीडियावर, टीव्हीवर, वर्तमानपत्रांमध्ये जिकडे तिकडे एकच शब्द कानी पडत होता ‘कोरोना’.
संपूर्ण जग कोरोनावर काय औषध निघेल याची वाट बघत होतं. आणि शेवटी कोरोनावरील लस ही आलीचं. खरंच या प्रतिकूल परिस्थितीतही माणूस निश्चिंत झोपत होता पण या निवांतपणे झोपण्यामागे एकच ते खरे योद्धे होते. जे डोळ्यात तेल लावून जे जनतेची सेवा करत होते, जे कोरोनायोद्धे आहेत..अश्या पोलीस, डॉक्टर, नर्स आणि अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्वांना शिवबंधनचा सलाम.
हो पण एक वर्ष उलटून गेलं लसीकरण सुरू झालं तरी कोरोना गेला नाही आहे बरं का! त्यामुळे सगळ्यांनी नियमांचे पालन करा, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.