अमेरिकेतील कॅपिटॉलमध्ये वाहनाने धडक दिल्याने एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.वॉशिंग्टन कॉम्प्लेक्स येथे वाहनाने सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिअरला धडक दिली आणि आतमध्ये घुसले. यावेळी दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. चालकाने वाहनातून बाहेर येत पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचं पोलीस प्रमुखांनी सांगितलं आहे. यातील एका पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लॉकडाऊन लावल्याचे AFP ने माहिती दिली आहे.
दरम्यान या २५ वर्षीय हल्लेखोराची ओळख पटली असून हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. “हा हल्ला दहशतवादाशी संबंधित असल्याचं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही, मात्र आम्ही नक्कीच तपास करणार आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं असून हल्लेखोराने मार्च महिन्यात ऑनलाइन केलेल्या काही पोस्टमधून निराशा आणि विकृती जाणवत आहे. आपण बेरोजगार असून आरोग्याच्या समस्या असल्याचाही उल्लेख त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.