मुबंई दि. १३ – १ मार्चपासून संपूर्ण राज्यात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. परंतु जे.जे. रुग्णालयात १ मार्चपासून खास पाहुण्याचाचं पाहुणचार केला जात असल्याचे समोर आले आहे. व त्यात पाहुण्याचं वय ३५ वर्षाखालील असेल तरीही त्यांना लस दिली जात आहे. १ मार्चपासून जे.जे. रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या ‘खास पाहुण्यां’ची गर्दी वाढायला लागली आहे. यात आत्तापर्यत अनेक मंत्री, राजकीय नेते लस घेण्यासाठी येऊन गेले आहेत.
नोंदणी केलेले ज्येष्ठ नागरिक केंद्राबाहेर तातकळत असताना वयोगटात न बसणाऱ्या किंवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नसणाऱ्या तरुणांना लस दिली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यांची नोंदणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून केली जात आहे.
४५ वर्षांवरील रुग्ण किंवा ६० वरील ज्येष्ठ नागरिक या वयोगटांमध्ये बसत असल्याने त्यांना लस देणे हा प्रक्रियेचा भाग होता. परंतु अलीकडे खास पाहुणे म्हणून मालिकांमधील अभिनेत्यांसह अनेक तरुण मंडळीही लस घेण्यासाठी जे.जे.मध्ये हजेरी लावत असल्याचे निदर्शनास येत आहे.