“वासुदेव आला हो,वासुदेव आला..”
महेश पाटील बेंबळी,तुळजापूर

“वासुदेव आला हो वासुदेव आला..”
“दान पावलं अहो,दान पावलं |सकाळ च्या पारी हरीनाम बोला,वासुदेव आला हो वासुदेव आला||..”
असे भल्या पहाटे अंगणात सडा रांगोळी ने अंगण सजले असताना, अंगणात येऊन “माऊली संताची सावली |वंदावी तुळस ||”अशी ओवी म्हणत येतो. घरातील गृहीणी सुप घेऊन धान्य देते आणि मुला बाळांना आर्शिवाद घेते. वासुदेव स्वतःभोवती ‘दान पावलं ‘असे म्हणत गिरकू मारतो..
डोक्यावर मोराची पिसे असलेली टोपी, पायात घुंगरू, कंबरेला तांबडा शेला आणि तोंडात रामकृष्णाचा गजर करत गावातील प्रत्येक घराबाहेर जाऊन आपल्या पोटासाठी जे देईल,तो आनंदाने घेऊन पुढच्या घराचे पाऊल चालतो….
” वासुदेव व पोतराज यांच्यामुळे गावावरील संकटे कमी व्हायची अशी मुखदगत आधुनिक आख्यायिका ऐकून आहे.”
आजकाल गावाचे रूपांतर शहराच्या दिशेने होत आहे.गावं मोठी होत आहेत आणि गाव जागं करणारा वासुदेव गावातून लोप पावत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसंस्कृती मधील महत्वाचा घटक असणारा वासुदेवाला स्थानच उरले नाही.निवडक कलावंतानी ही परंपरा जपून ठेवली आहे.
वारी व त्या गावातील याञा या मध्ये तुरळक दिसून येत असत.वासुदेवाची परंपरा खूप हजारो वर्षापासून असून आता वासुदेव मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत असल्याने लोकसंस्कृती मधील वासुदेव आजच्या बदलत्या परिस्थितीत टी.व्ही मालिका मध्ये कुठे तर दुर्मिळ दिसत आहे.
निसर्गाचा -हास,पर्यावरण जनजागृती देखावा,नाटक यात वासुदेव समाज प्रबोधन करत असताना दिसत आहे. पण आता गाव गाड्यातील बालकांचे मनोरंजन करणारा,गावातील आणि घरातील संकटे दूर लोटणारा वासुदेव गावगाड्यातून कोसोदूर लोटला आहे…….
“महेश पाटील बेंबळी,तुळजापूर ”
“लेखक महेश पाटील यांनी लोकसंस्कृती मधील ‘वासुदेव ‘या लोककलावंताचे वर्णनात्मक चित्रण वरील लेखातून रेखाटले आहे…”