सोलापूर – ७६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली.यात संपूर्ण देशभरातून सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील विनोद कांबळे दिग्दर्शित ‘कस्तुरी’ या हिंदी भाषेतील चित्रपटाला ‘सुवर्ण कमळ’ मिळालं आहे. अमर देवकर यांच्या ‘म्होरक्या’ चित्रपटानंतर बार्शीला हा दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
‘कस्तुरी’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बार्शीतच झालेले असून,टेक्निकल टिम वगळता सर्व कलाकार हे बार्शीतीलच आहेत. सफाई कामगाराच्या मुलाची व्यथा ‘कस्तुरी’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. समाजातील कनिष्ठ दर्जाची काम करणाऱ्या मुलाची ही कथा आहे.
कस्तुरीचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी यापूर्वी लघुपट बनवले आहेत.
मात्र, मोठा चित्रपट बनवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आणि पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने ‘कस्तुरी’ चित्रपटाच्या टीमने घेतलेल्या कष्टाची त्यांना पोचपावती मिळाली आहे. त्यामुळं ‘बार्शी तिथं सरशी’ हे ब्रीद पुन्हा एकदा ‘कस्तुरी’ चित्रपटाच्या टीमने खरं करून दाखवलं आहे.