मुंबई : पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारशी आमचं कुठलंही भांडण नाही. केवळ महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही म्हणून सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांची कोंडी करायची, हे योग्य नव्हे. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखविले.
आज कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्र कोलमडला तर देशही कोलमडेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेत्यांना (भारतीय जनता पक्ष) माहिती असायला हवी, असे वक्तव्य राऊत यांनी आज केले. ते रविवारी मुंबईत पत्रकार मद्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी कोरोना परिस्थितीतील महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक झाले पाहिजे, असे म्हटले. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, महाराष्ट्राचा कोरोना चाचण्याच जास्त होत असल्यामुळे रुग्णही जास्त सापडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतूक केलंच पाहिजे.
तसेच संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाचे समर्थन केले. मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने घेत नाहीत. आपातकालीन परिस्थितीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना असे निर्णय घेणे अपरिहार्य असते. अशावेळी आपला वैयक्तिक दृष्टीकोन वेगळा असला तरी एक राज्य म्हणून महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.