सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गामध्ये झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. तसेच मोठया प्रमाणात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. या वाढत्या संसर्गामुळे लग्न संभारंभ आणि धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र या संसर्गातही मध्यप्रदेशात पार पडलेल्या लग्नाची आता सर्व देशभरात चर्चा होताना दिसून येत आहे.
या लग्नात वधूवरांनी PPE किट घालून एकमेकांबरोबर सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेऊन अग्निपुढे सात फेरे घेतले होते. प्रकरण असे की मध्यप्रदेशातील रतलाममध्ये जोडप्याचे काही दिवसांपूर्वी लग्न ठरले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांपूर्वी नवरदेवाला कोरोनाची लगान झाल्यामुळे आता हे लग्न कसे पार पडणार असा प्रश्न वधू आणि वराच्या दोन्ही बाजुच्या लोकांना पडला होता.
मात्र यावर वधू मुलीने हार न मानता PPE किट घालून लग्नाला उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. या लग्नात वधू-वराने PPE किट घातले होते. तसेच लग्न लावून देणाऱ्या भटजीने आणि उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी सुद्धा PPE घातले होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेला नवरदेव लग्नाला उभे राहिलेले असल्याचे कळताच पोलिसांनी धाव घेतली होती.