मुंबई : रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन स्वतःजवळ असलेले पुरावे त्यांना सुपूर्त केले होते, तसेच पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप आघाडी सरकारवर
लगावले होते. मात्र, यावरून राज्यात सत्ताधारी पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीसांनी वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात. पण जेव्हा वारंवार महाराष्ट्राचा नेता या मर्यादा ओलांडून दिल्लीकडे तोंड करून बघतो, तेव्हा सह्याद्रीही ओशाळतो”, अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ५ वर्ष सांभाळणं हे फडणवीसांचं भाग्य होतं. तशी संधी त्यांना मिळाली. त्यातून त्यांनी उत्तम प्रकारे काम केलं. त्यातून त्यांना एक अनुभव मिळाला. हा अनुभव त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून देखील वापरायला हवा. विरोधी पक्षनेत्याने आक्रमक व्हावं. पण हा आक्रमकपणा राज्याच्या प्रतिष्ठेच्या मुळावर येईल इतका नसावा असे सुद्धा राऊत यांनी बोलून दाखविले होते.