दिग्दर्शक अनुराग काश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालयावर बुधवारी इन्कम टॅक्स विभागाने धाड मारली आहे. अनुराग कश्यप व तापसी पन्नू यांची चौकशीही करण्यात आली. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सवाल उठवला आहे.
देशात जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा तेव्हा सिने उद्योगातील लोकांनी सर्वात आधी आवाज उठवला आहे. परंतु आज देशात दडपशाही सुरू असताना बॉलिवूडमधील दिग्गज गप्प का आहेत? असा सवाल करतानाच आवाज उठवणं केवळ तापसी पन्नू किंवा अनुराग काश्यप यांचं काम नाही. तुमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे, असं आवाहनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बॉलिवूडला केलं आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर कोणी बोललं तर त्याला गुन्हेगार आणि देशद्रोही ठरवणं योग्य नाही. बॉलिवूडने अशा कारवायांना घाबरू नये. हा लोकशाही देश आहे. मोदी लोकशाही मार्गानेच सत्तेत आले आहेत. लोकशाहीने येऊन कोणी हुकूमशाही राबवत असेल तरी हा लोकशाही देश आहे, असं सांगतानाच सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही, गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला हवा असे संजय राऊत म्हणाले.