बेळगाव : बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीत एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत बेळगावात दाखल झाले होते. तसेच राऊत यांची प्रचार सभा सुद्धा बुधवारी बेळगावात पार पडली होती, त्यामुळे येणाऱ्या दिवसात शिवसेना विरुद्ध भाजप, असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी बुधवारी आपल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बेळगाव पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपात वाद पेटण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
तसेच उद्या बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रचाराला आले तरी शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही. आईची मुलापासून ताटातूट करण्यासाठी भाजप आणखी काय करणार? शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. बेळगावची जनता साद घालेल तेव्हा महाराष्ट्र कायम पाठिशी उभा राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले.