रात्रीच्या वेळी चंद्र उगवला की अंधारात तो अत्यंत तेजस्वी दिसतो. प्रत्येकवेळी चंद्राचा आकार हा कधी अर्धा तर कधी पूर्ण असतो मात्र आज आकाशात सुपरमून दिसणार आहे. आज चैत्र पौर्णिमेचा दिवशी म्हणजे २७ एप्रिल रोजी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात सुपरमून दिसणार आहे.
पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. महिन्यातून तो एकदा पृथ्वीजवळ येतो व एकदा दूर जातो. मंगळवारी चंद्र पृथ्वीजवळ तीन लाख ७३ हजार ३७९ किलोमीटर अंतरावर येणार आहे. चैत्रपौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीजवळ आल्यामुळे सुपरमून दिसणार आहे. रात्री ७ वाजून २३ मिनिटांनी चंद्र पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळेल.
साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन घेता येईल. यानंतर यावर्षी वैशाख पौर्णिमेच्या रात्री २६ मे रोजीही सुपरमून दिसणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.