सध्या देशात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असून दिवसाला रुग्ण वाढत आहेत. रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणारे, माणुसकीला जपणारे काही लोक आपल्या अवतीभवती आहेत. कन्नड अभिनेता अर्जुन गौडा या भीषण महामारीच्या काळात अॅम्बुलन्स ड्रायव्हर बनला आहे. गंभीर रूग्णांना रूग्णालयात पोहाचवून तर प्रसंगी मृतदेह घाटावर पोहोचवून तो माणुसकीचा धर्म जपतो आहे.
कोरोना रुग्ण वाढल्यापासून प्रत्येकजण आपल्याआपल्या परीने मदत करत आहेत. काहीजण रुग्णालयात बेड देत आहेत तर दुसरीकडे ऑक्सिजन देत आहेत. तसेच अभिनेता अर्जुन गौडा त्यापैकीच एक. महामारीच्या या भीषण काळात प्रोजेक्ट स्माईल ट्रस्ट अंतर्गत अर्जुन पीपीई किट घालून दिवसरात्र लोकांना सेवा देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पीपीई किट घालून अर्जुन गरजूंना सेवा देत आहे.
लोकांचा धर्म न बघता, माणुसकीच्या नात्याने या कठीण काळात मी लोकांना मदत करतोय. आणखी काही महिने मी ही सेवा देत राहिल. माझ्या लोकांच्या मदतीसाठी मी खारीचा वाटा उचलू शकलो तर मला त्यात आनंद आहे, असे अर्जुनने सांगितले.