बंगळुरुमधील एका महिलेने झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केलं असता तिने ती ऑर्डर रद्द करण्यास सांगितल्यास तिला झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप बंगळुरुमधील एका महिलेने केला आहे. घरात घुसून आपल्याला मारहाण झाली असल्याचं महिलेने सांगितलं आहे. कंटेंट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने मारहाणीनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला असून नाकातून रक्त वाहताना दिसत आहे. मारहाणीमुळेच आपली ही परिस्थिती झाली असल्याचं हितेशाने सांगितलं आहे. दरम्यान झोमॅटोने या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून आमचा स्थानिक प्रतिनिधी तुम्हाला पोलीस तपासात मदत करेल असं आश्वासन दिलं आहे.
व्हिडीओमध्ये हितेशा रक्तबंबाळ अवस्थेतील आपलं नाक दाखवत आहे. “माझी झोमॅटो डिलिव्हरी ऑर्डर उशिरा आली आणि मी कस्टमर केअरसोबत बोलत होते, यादरम्यान डिलिव्हरी बॉयने हे केलं. त्याने मला मारहाण केली आणि इथे रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळ काढला,” असं हितेशा सांगत आहे.
So guys this just happened to me yesterday
Pls support me @zomato @zomatoin @viralbhayani77 @sagarmaheshwari @ATSBB @bbcnewsindia @narendramodi @cnnbrk @AltNews @NBCNews @itvnews @DgpKarnataka @TV9Telangana pic.twitter.com/TBso6N23k3— Hitesha Chandranee (@HChandranee) March 10, 2021
यानंतर हितेशाने अजून एक व्हिडीओ शेअर केला असून यावेळी तिने नाकाला पट्टी बांधली आहेमी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ऑर्डर दिली, जी साडे चार वाजेपर्यंत येणं अपेक्षित होतं. ऑर्डर वेळेत न आल्याने मी वारंवार फोन करत होती. एक तर मला मोफत द्या किंवा मग ऑर्डर रद्द करा असं मी कस्टमर केअरला सांगत होते”.
“त्यानंतर झोमॅटो डिलिव्हरी बॉय आला. तो खूप उद्धट होता. मी दरवाजा पूर्णपणे न उघडता त्याला आपण कस्टमर केअरशी बोलत असल्याचं सांगितलं. ऑर्डर उशिरा आल्याने आपल्याला ती नको असल्याचं त्याला सांगितलं. यावेळी त्याने नकार देत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मी तुमचा नोकर आहे का ? असं तो विचारत होता. मी खूप घाबरले आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण तो दरवाजा ढकलून आतामध्ये आला, माझ्याकडून ऑर्डर खेचून घेतली आणि नाकावर ठोसा मारुन पळ काढला,” असं हितेशाने आपल्या चार मिनिटांच्या व्हिडीओत सांगितलं आहे.
झोमॅटोने हितेशाची माफी मागत भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी काळजी घेऊ असं आश्वासन दिलं आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे.